Pola Essay in Marathi – शेतकऱ्याचा जिवाभावाचा सोबती म्हणजे बैल! या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे पोळा. श्रावण अमावास्येला साजरा होणारा हा सण कृषिसंस्कृतीचे सुंदर दर्शन घडवतो. येथे बैल पोळा निबंध दिला आहे.
बैल पोळा निबंध (३०० शब्द)
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतीचा खरा आधार म्हणजे बैल. वर्षभर शेतात राबणाऱ्या या मुक्या सोबत्याचे उपकार फेडण्याचा दिवस म्हणजे पोळा! हा सण श्रावण महिन्याच्या अमावास्येला महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात, मोठ्या उत्साहात साजरा होतो.
पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांद्यांना तेल-तूप लावून त्यांना विश्रांती दिली जाते; याला ‘खांदेमळणी’ म्हणतात. पोळ्याच्या दिवशी पहाटे बैलांना नदीवर किंवा तळ्यावर नेऊन आंघोळ घातली जाते. मग सुरू होतो त्यांचा शृंगार! शिंगांना हिंगूळ लावून बेगड चिकटवली जाते, गळ्यात घुंगरांच्या माळा आणि कवड्यांचे हार घातले जातात, अंगावर झूल पांघरली जाते आणि कपाळावर बाशिंग बांधले जाते. नवरदेवासारखा सजलेला बैल पाहून शेतकऱ्याचा ऊर अभिमानाने भरून येतो.
या दिवशी बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य होतो. सर्जा-राजाची पूजा करून त्यांना पुरणपोळी खाऊ घातली जाते. संध्याकाळी गावातील मारुती मंदिराजवळ सर्व बैलांची मिरवणूक निघते. ढोल-ताशांच्या गजरात ‘झडत्या’ म्हटल्या जातात. ज्यांच्याकडे बैल नाहीत, ती मुले मातीच्या किंवा लाकडाच्या बैलांची पूजा करतात. लहान मुलांचा हा ‘तान्हा पोळा’ पाहण्यासारखा असतो!
पोळा हा केवळ सण नाही, तर प्राण्यांविषयीच्या कृतज्ञतेचा संस्कार आहे. ‘ज्याच्या जीवावर आपण जगतो, त्याचे उपकार विसरू नयेत’ ही शिकवण हा सण देतो. आजच्या यंत्रयुगात ट्रॅक्टर आले असले, तरी शेतकऱ्याच्या मनातले बैलांचे स्थान कायम आहे. मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला शिकवणारा हा सण म्हणूनच मला खूप आवडतो!
बैल पोळा – 10 ओळी
- पोळा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आहे.
- हा सण श्रावण अमावास्येला साजरा होतो.
- या दिवशी बैलांची पूजा केली जाते.
- बैलांना आंघोळ घालून सजवले जाते.
- शिंगांना रंग व गळ्यात घुंगरमाळा घालतात.
- बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.
- या दिवशी बैलांकडून काम करून घेत नाहीत.
- संध्याकाळी बैलांची मिरवणूक निघते.
- लहान मुले मातीच्या बैलांची पूजा करतात.
- पोळा हा सण प्राण्यांविषयी कृतज्ञता शिकवतो.
FAQ
पोळा सण कधी साजरा केला जातो?
पोळा हा सण श्रावण महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो.
पोळा सण का साजरा करतात?
वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा साजरा करतात.
हे देखील वाचा:
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी हीच मोठी संधी – majhi naukri या पानावर तलाठी, ग्रामसेवक भरतीचे अपडेट्स पहा.








Leave a Comment
You must be logged in to post a comment.